आम्हाविषयी

 श्री स्वामी समर्थ 

नमस्कार मित्रांनो…….
          आजच्या संगणकाच्या युगात शिघ्रातिशिघ्र होणाऱ्या माहितीच्या आदान-प्रदानामुळे संपुर्ण जग एकदम जवळ येऊन ठेपले आहे. एका क्षणात आपल्याला कोणतीही माहिती घरबसल्या मिळत आहे. इंटरनेटमुळे आपली  वैचारीक क्षमता व आकलन श्रेणी विस्तारत आहे. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही इंटरनेटचे जाळे वेगाने पसरत आहे. एकेकाळचा गावचा अडाणी आज अंबानी व्हायची महत्वकांक्षा बाळगत आहे. हे एक देशाच्या विकासाचे व प्रगतीचे लक्षण आहे. आज मोबाईलद्वारे आपण जगांशी जोडल्या गेलेलो आहोत. हे निश्चितच संतुष्टीकारक आहे. याचा विचार करूनच हे संकेतस्थळ तयार केलं गेल आहे. या संकेतस्थळांवरून सर्वांना सर्वतऱ्हेंचे उपयोगी ज्ञान भांडार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
          मी माझ्या आयुष्याचा खुप मोठा काळ हा सामाजिक कार्यात, आध्यात्मिक क्षेत्रात घालवला आहे व अजुन ही या क्षेत्रात आपले योगदान देत आहे. आध्यात्मिक कार्य  हे माझे कर्तव्य आहे तर सामाजिक कार्य हे माझे कर्म आहे, असे समजून मी या क्षेत्रात काम करतो. आध्यात्मात माझे गुरूस्थानी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर सामाजिक कार्यात मी सर्व क्रांतीकारकांना आदर्श मानतो.
          वयाच्या तेराव्या वर्षापासून मी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महारांजाची सेवा करतो, स्वामींच्याच आशिर्वादाने परभणी जिल्ह्यातील जवळपास 90 गावामध्ये ग्राम विकास अभियानाद्वारे जनजागृती करून लोंकाना आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शेती विषयक, बाल संस्कार, व्यसनमुक्ती, घरगुती आयुर्वेद आदि विषयावर मार्गदर्शन करण्याचे काम आमच्या समुहाने केले आहे व अजूनही करत आहोत. गरजुंना मदत व दु:खितांना दिलासा देण्याचे काम करण्यासाठी हे अभियान आम्ही चालवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व काम आम्ही विनामुल्यपणे करतो. गावातील लोकांना कुठलाही भार पडु नये यासाठी आम्ही आमचे पिण्याचे पाणी व जेवणाचे डब्बे सुध्दा स्वत:च्या घरूनच घेऊन जातो.
आता याच कामाला गती देऊन याला विस्तारित स्वरूपात पुढे नेण्यासाठी विचार व वाटचाल सुरू आहे. समाजाला पुढे नेण्यासाठी व पाश्चिमात्य संस्कृतीचे वेगाने होणारे अतिक्रमण थोपविण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात सर्व संत-महात्मे, तपस्वी, आयुर्वेदातील सर्व महर्षी यांचे समाज उपयोगी विचार घराघरात पोहोचविणे, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार मुल्ये याची जपवणुक करणे. तसेच  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभू राजे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, स्वांतत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, स्वदेशी व स्वराज्याचे जनक लोकमान्य टिळक तर आधुनिक युगात स्वदेशीचा जागर घराघरात पोहोचविणारे स्वदेशी रक्षक श्री राजीव भाई दीक्षित यांच्या विचारावर चालणे व या महान पुरूषांचे विचार सर्वदूर पाहोचविणे हा माझा संकल्प आहे.
          प्राचीन भारताचा गौरवपुर्ण इतिहास नविन पिढ्यांसमोर सत्य स्वरूपात मांडून युवकांचे प्रबोधन करण्याचे काम या संकेतस्थळांवरून करण्याचा माझा दृढ संकल्प आहे. स्वदेशीचा जागर, आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार, स्वदेशी व वैदिक शिक्षा पध्दतीचा विकास करणे, नैसर्गिक व प्राकृतिक शेती विषयी जनजागरण करणे अशा राष्ट्रहितांच्या कार्यासाठी हे संकेत स्थळ अर्पण केलेले आहे.
          संकल्प जरी  मोठा व अवघड  असला तरी याला पुर्ण करण्यासाठी  मला आपल्या सर्वांचे सहकार्य हवे आहे. आपण याकामी मला शक्य होईल त्या परीने आपण सहकार्य कराताल, अशी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो.
          शेवटी  सृष्टि नियंता परमेश्वर, परमात्म्याला शरण जाऊन स्वामींच्या चरणी  नतमस्तक होऊन येथेच विरामतो.
 श्री स्वामीचरणार्पणमस्तु