भगवत् नामातून - मुक्तीकडे



भगवत् नामातून - मुक्तीकडे


नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।
लगे सायास जावे वनातंरा । सुखी येती घरा नारायणा ॥धृ॥
ठाईच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥१॥
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥

या अभंगाद्वारे संत तुकारामांनी भगवत् नामाची थोरवी गायली आहे. नामाचे श्रेष्ठत्व व नामाची व्याप्ती दर्शवणारे यापेक्षा सोपे व रसाळ अन् गहणीय शब्द सापडणे कठीणच आहे. एवढ्या सहजतेने तुकारामांनी ईश नामाचे महत्व गायले आहे.  भंगवताला विनासायास मिळवायचे असेल तर नामस्मरणाशिवायय दुसरा सोपा मार्ग नाही. केवळ नामस्मरणाने भगवंत आपल्याला मिळू शकतो. साधनेच्या मार्गात अनेक मार्ग आहेत, यात यज्ञ, याग, जप तप, योग प्राणायाम यांचा समावेश होतो.  मात्र या सर्वात सरळ, साधा व श्रेष्ठ मार्ग म्हणजे ईश्वरांचे नामस्मरण होय. ईश्वर नामात एवढी प्रचंड शक्ती आहे, ती दुसरी कशातच नाही. याची साक्ष म्हणजे हजारो वर्षापासून आजगायत रामनामाने उभा राहीलेला रामसेतू होय. हे नामाचे सामर्थ्य आहे. ज्याने अशक्यही शक्य होते. भगवत् नामाने पर्वतायमान असलेल्या पापाच्या राशी सुध्दा जळून खाक होतात. नामस्मरणाने नराचा नारायण होतो. नामाने आत्माच परमात्माचे स्वरूप धारण करतो. आत्मा हा वेगळा न राहता तो जीवनमुक्त होऊन परमात्म्यात सामाऊन जातो.
ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला.  या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील. ज्यात भक्त प्रल्हाद, अजामेळ एवढेच काय पण गंजेद्र नावाचा हत्ती सुध्दा नामस्मरणानेच तरला. तर आधुनिक काळात संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकारामापर्यंत सर्वांनी नामास्मरणाचेच माध्यमातून मुक्ती मिळविली असे आपल्याला दिसेल. राक्षरांच्या सोबत राहून त्यातही पित्यांचा एवढा अन्याय, अत्याचार सहन करून प्रल्हाद हा भक्त प्रल्हाद झाला. केवळ रात्रदिवस केलेल्या नामस्मरणानेच त्याच्यासाठी नारायण धावून आला.. तर दुसरीकडे उच्च कुळात जन्मुनही वासनेच्या आहारी गेलेला अजामेळ हा तर केवळ पुत्राच्या ठेवलेल्या नारायण नामाने मुक्तीस मिळाला. एवढे महत्व नामाचे आहे. याही पुढे जाऊन पाहीले तर केवळ संकट काळी परमेश्वराचे चितंन करून हाती पडलेले क्षुल्लक कमळाचे फुल अर्पण करून गजेंद्राने आपला मोक्ष साधला. तर मग तुम्ही आम्ही तर माणसे आहोत, आपण का नाही नामातून मुक्तीकडे जाणार. आपण ही जाऊ मात्र नामात तशी श्रध्दा व निष्ठा पाहीजे. नामात तशी विनम्रता व सर्मपण भाव पाहीजे.
नाम घेताना देह हा नाममय झाला पाहीजे. जसे नामाच्या भावविभोरतेमुळे जनाबाईच्या गोवऱ्या सुध्दा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या चोखोबाच्या मृत शरीरातील हाडे सुध्दा विठ्ठल विठ्ठल असा निनाद करू लागली. ही नामाची शक्ती आहे. या शक्तीच्याच बळावर जनाबाईने विठोबाला आपले दळण-भांडी करायला लावले, तर याच नामस्मरणाने चोखोबाचे दहा दिवस सुतक विठोबाने धरले. यातून आपल्याला दिसते की, नामस्मरणाने भंगवंताला नुसते भेटताच येत नाही तर त्याला वश सुध्दा करता येते. म्हणून आपण नामास्मरण करावे. आपल्या मुखातून नेहमी भगवंताचे नाम निघावे, कामाशिवाय वायफळ बोलण्यापेक्षा फक्त राम राम म्हणावे, म्हणजे राम भेटेल. असे श्री गोदवलेकर महाराज म्हणायचे. तर तुम्ही फक्त तेरा कोटी रामनामाचा जप करा, म्हणजे निश्चिंतच तुम्हाला राम भेटेल असे जाहीर आवाहन रामदास स्वामी करायचे. एवढी छातीठोकपणे राम भेटण्याची ग्वाही देवून सुध्दा आम्ही राम म्हणत नाहीत. म्हणजे आमच्या सारखे कपाळ करंटे आम्हीच असेच म्हणावे लागेल.
नामस्मरणाचे आवाहन करताच लोक विचारतात, नाम घ्यायचे ठिक आहे हो, पण ते कुणाचे आणि किती दिवस व कसे घ्यावे ? हे सांगा. आता हा काय प्रश्न आहे. तरी सुध्दा गोदवलेकर महाराज म्हणतात, जसे पाळण्यातले लहान मुल आपली आई आपल्याला उचलून घेऊन दुध पाजत नाही, तो पर्यंत अतिशय जोरात सर्व जीव एकत्र करून किंचाळते, तेव्हा मग त्या लहानांचा आवाज ऐकूण आई क्षणचाही विलंब न करता सर्व कामे सोडून धावत येते व त्याला उचलून घेते. तशाच भावनेने व तल्लीनतेने तुम्ही नाम घ्या. म्हणजे क्षणाचाही विलंब न करता विश्वाची आई तुमच्या कडे धावत येईल. पण आपल्या ऱ्हदयात लहान मुलासारखे भाव पाहिजेत.
    आता यापेक्षा सोपे कोणते साधन असू शकेल काय
         

                                                                                  


-                                                                                                                                        


             -   श्री. सुनिल कनले 


प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात  बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची  ज्योत पेटवणाऱ्या
अक्कलकोटच्या  श्री  स्वामी  समर्थ महाराजांचा सेवकरी !