रामायणाचे महत्व



रामायणाचे महत्व

रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्या माणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. ते कधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूस या तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही.
            रामायण हे जीवनाची व्यथा, दु:, समस्या, संकटे कमी करण्यासाठी अवश्य वाचा. याचा फायदा होईल. रामायणाचे मनन, चिंतन, श्रवण पठण करावे. आपल्या सर्व दु:खाचे, समस्येचे उत्तर त्यात मिळेल. आई-वडिल, समाज, भाऊ-बंदाशी कसे वागावे, याचे उत्तर त्यात मिळेल. याप्रमाणे आचरण केल्यास रामराज्य यायला वेळ लागणार नाही. दहशतवाद, भ्रष्टाचार, चोरी, छल, कपट याचा नायनाट रामायणातील ज्ञानाने होईल. पत्नीने पतीला कधी काय मागावे, कधी काय सांगावे याचे उत्तर त्यात आहे. चुकीचा वेळी चुकीची मागणी केली तर सुखी संसाराचे कसे वाटोळे होते, याचे ज्ञान त्यात मिळेल.
            प्रत्येकाला आज पदाची मोठेपणाची हाव आशा आहे. पण बघा परमेश्वराकडे कोणतेही पद नाही किंवा स्वार्स्थ नाही. तरीही तो आपले काम वेळेवर अचुक पणे करतो. तसेच कधीच कोणत्याही संताने कधीही पदाची, मोठेपणाची हाव धरली नाही. संपत्तीचा मोह केला नाही. उलट आपल्या जवळील संपत्ती सुध्दा वाटून टाकली. आपल्याला तर केवळ काही वर्षासाठी एखादे पद मिळते. तरीही आपण स्वार्थाचाच विचार करतो. मोठेपणा मिरवतो. नंतर आपल्या पदापुढे माजी हे विशेषण लागते. परंतु माजी प्रभु श्री रामचंद्र, माजी श्री कृष्ण किंवा माजी संत तुकाराम, माजी संत ज्ञानेश्वर असे कोणीही म्हणत नाही. म्हणुन कोणतेही काम हे निष्काम भावनेने निस्वार्थीपणे करावे. समाजाचे हित पाहून आपले योगदान द्यावे.
            भाविकाने कधीही स्वार्थाचा विचार करू नये. स्वार्था पेक्षा परमार्थ मोठा आहे. आपले विचार हे नेहमी इतरांचा उत्कर्ष साधणारे असावेत. ज्यामुळे आपला ही विकास होईल समाजाचे ही हित साधेल आणि यातून आपला भारत देश बलवान होईल. विचाराबरोबरच दुसरी गोष्ट म्हणजे आचरण. आपले आचरण देखिल स्वच्छ निष्कलंक असावे. त्यात छल, कपट, द्वेष, राग, क्रुरता नसावी. फक्त प्रेम सामाजिक जिव्हाळा असावा. मनुष्य स्वार्थ साधून क्षणिक समाधानी होतो, नाव प्रतिष्ठा मिळवतो. परंतु जो समाजाचा फायदा करतो तो समाधानी होऊन अजर अमर होतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्वामी विवेकानंद यांचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्याला दिलेल्या शिक्षेतून होईल. रामकृष्णांच्या एका शिष्याने 14 वर्षे कठोर साधना करून एक योग विद्या प्राप्त केली. नंतर तो आनंदाने आपल्या गुरू परमहंसाकडे जाऊन त्यांना कूतुहलाने सांगू लागला की, गुरूदेव मी अशी विद्या प्राप्त केली आहे की, ज्यामुळे पाण्यावरून सहज चालू शकतो.त्याला वाटले आपल्या या कृत्तीने गुरूदेव खुप प्रसन्न होतील, आपल्या मिठी मारतील. मात्र रामकृष्ण परमहंस गंभीर मुद्रा करून त्याला म्हणाले, अरे वेड्या बाळा ! तू उगाच एवढे कष्ट घेतलेच आयुष्याचे 14 वर्षे फुकट घालवलेस.तेव्हा शिष्याचा खुप हिरमोड झाला त्याला आपल्या गुरूंचा मनातून राग आला. पण तसे दाखवता त्याने खिन्नपणे विचारले की, मी केलेले हे सर्व वाया कसे गेले. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, हे बघ बाळा ! दिड-दोन आण्यात नावाडी तुला नदी पार करून सोडतो. म्हणजे तुझी चौदा वर्षाची विद्या फक्त दिड-दोन आणे किमतीची आहे. या ऐवजी तू जर गरिबाकरीता, दीन-दुबळ्यां करीता काही कार्य केले असतेस तर तूझे कल्याण झाले असते आणि मला खुप आनंद झाला असता.हे शब्द ऐकून शिष्याची मान शरमेने खाली झुकली.
            अशी विचार श्रेणी पाहीजे, तरच देशाचा विकास होईल. देशात एकता, प्रेम, बंधुता, राष्ट्रभक्ती वृध्दिंगत होईल. देशातील गरीब-श्रीमंत दरी कमी होईल. पण असे होताना  कुठेही आज दिसत नाही. उलट सगळीकडे स्वैराचार, अनीती, अत्याचार याने थैमान मांडले आहे. जो तो स्वार्थाने आंधळा झाला आहे.
            आज माणूसएवढा क्रुर वागतो आहे की, त्याला पशूची उपमा देणे हा त्या पशुचा अपमान केल्यासारखा होईल. कारण पशु देखील आपला धर्म पाळतात. सर्वात हिंस्र प्राणी वाघ किंवा सिंह. पण वाघ कधीही वाघावर किंवा सिंह कधीही सिंहावर हल्ला करत नाही. परंतु माणूस हा आपल्याच भावंडाचे मुडदे पाडायलाही मागे पुढे पाहात नाही. एवढी वाईट परिस्थिती आज माणसाची झालेली आहे. एकेकाळी  बुध्दिमान, सर्वश्रेष्ठ, ज्ञानी समजला जाणारा माणूस आज स्वत:ची ओळख आज विसरला आहे. आज माणसाचा दर्जा इतका खालावला आहे की, मनुष्य चोरी करतो आणि त्याला शोधण्याचे काम एक कुत्रा करतो. ही खुप लाजीरवाणी बाब आहे.




-   श्री. सुनिल कनले

प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात  बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची  ज्योत पेटवणाऱ्या
अक्कलकोटच्या  श्री  स्वामी  समर्थ महाराजांचा सेवकरी !