आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 01



 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 12 वे
आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 01
करिती कीर्तन सांगती पुराण । परि आत्मज्ञान नाही नाही

स्वामी भक्तांनो,
         काल स्वामींच्या नावे बाजार मांडून भक्तांना लुटणाऱ्या, ढोंगी लोकांना प्रेमाचा हितोपदेश देणाऱ्या, आनंदनाथ महाराजांनी आजच्या आपल्या अभंगातून, या ढोंगी लोकांना कसे ओळखायचे ? यांची लक्षणे कोणती ? याची माहिती दिलेली आहे.
         हे ढोंगी लोक खुप चाणाक्ष आणि चतुर असतात. यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असतात. बाहेरुन जरी हे लोक प्रेमळ, निरागस, निर्लोभी, कनवाळू आहेत, असे भासवत असले तरी यांचे मुळ स्वरूप हे कपटी, पाताळयंत्री, लोभाचे भस्मासुर, वासनांध, पाषाणहृदयी असते. हे पाखंडी लोक आपल्या बाह्य स्वरुपाने दुःखित, पिडीत, गरजू लोकांना आपल्या जाळ्यात अलगद ओढतात व एकदा का तो पूर्णपणे अकिंत झाला की, मग यांचे मुळ स्वरुपातील कपटी डावपेच सुरु होतात. यांचे हे राक्षसी रूप चाणाक्ष लोकांच्या लगेच ध्यानात येते. पण सुरुवातीला श्रद्धेपोटी, अंधविश्वासामुळे याकडे दुर्लक्ष केल्या जाते.
नंतर मग याचे प्रमाण वाढत गेल्यावर काही जणांना पद, पैसा देऊन आपल्याकडे वळवण्यात हे धुर्त लोक यशस्वी होतात. काही लोकांना साम, दाम, दंड, भेद या न्यायाने पद्धतशिर संपवण्याचे क्रूर काम ही हे तथाकथित ढोंगी बुवा करतात. एकीकडे जन माणसात संत म्हणून मिरवणारे हे दुष्ट लोक दुसरीकडे कंस आणि शकुनी होऊन वावरतात... या लोकांच्या मागे अंधपणे धावत गेल्याने क्षणिक लाभ होतील मात्र ना परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सापडतो ना जीवनाचे कल्याण होते, अंती फक्त आणि फक्त मनस्ताप भोगावा लागतो. तेव्हा भाविकांनी अशा दळभद्री लोकांपासून सावध राहावे, असाच मौलिक संदेश आपल्याला आजच्या स्वामीसखा आनंदनाथ रचित रचनेतून होणार आहे.
         तेव्हा आपण वेळ न घालवता या ढोंगी व कपटी लोकांची लक्षणे कोणती आहेत, याची माहिती घेऊ या !

करिती कीर्तन सांगती पुराण । परि आत्मज्ञान नाही नाही ॥1॥
पोटासाठी भलती केली खटपट । अभिमान खट धरूनिया ॥2॥
बोले ब्रह्मज्ञान कागदीच जाण । ऱ्हदय पाषाण खरे खरे ॥3॥
सांगुनिया लोकां, नाही घरी साठा।  दयेलागी तोटा सदोदित ॥4॥
आनंद म्हणे ऐसे बहू झाले संत । धने भ्रमविले जगामाजी ॥5॥
         स्वामी भक्तांनो, आजचा आपला अभंग हा स्वामींचे अंतरंगीचे शिष्य व स्वामींचे दिव्य आत्मलिंग मिळवणारे स्वामी स्वरूप श्री आनंदनाथ महाराज यांचा 05 चरणांचा, ढोंगी बुवा बाबांची ओळख करुण देणारा अभंग आहे. या अभंगातून आनंदनाथ यांनी वाट चुकलेल्या स्वामी भक्तांना एक योग्य रस्ता दाखवून दिला आहे.
करिती कीर्तन सांगती पुराण । परि आत्मज्ञान नाही नाही ॥
        अभंगाच्या पहिल्या चरणात आनंदनाथ सांगतात, बाबांनो हे ढोंगी लोक किर्तन करतात, प्रवचन करतात, कोणी 18 पुराणे सांगतात. कोणी व्याख्याने देतात, कोणी यालाच मार्गदर्शन, हितगुज, सुखसंवाद, भक्तिपुष्प अशी गोंडस नावे देतात. हे लोक जगभराचे ज्ञान वाटत फिरतात, खुप मोठ मोठ्या गोष्टि सांगतात. जीवापासून ते देहापर्यंत आणि सुखापासून ते मोक्षापर्यंत. सर्व प्रकारचे ज्ञान हे उगाळत बसतात. पण यांना आध्यात्माचा मुळ गाभा असलेला विषय म्हणजे 'आत्मज्ञान' याचे काडीचेही ज्ञान नसते. 'बडा घर पोकळ वासा' अशी यांची अवस्था असते. या ढोंगी लोकांचा आत्मज्ञानाशी काहीही संबंध नसतो. यांना फक्त पोपटपंची छान जमते. कारण ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे किंवा त्याचा जरासाही स्पर्श झाला आहे, तो व्यक्ति कधीही लौकिक गोष्टिंच्या मागे धावत नाही. तो कधीही मठ, मंदीर याच्या शाखा गांवोगाव काढत फिरत नाही. तो कधीही अर्थासाठी भटकंती करत नाही अथवा आपल्या अनुयायांना ईतर तीर्थक्षेत्री भटकू देत नाही. तर तो आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाला त्याच्या शंकेचे निरासरण करुण सन्मार्ग दाखवतो. त्याचे मन स्थिर करतो. त्याला सुरुवातीला एकाग्रतेसाठी पूजापाठ, त्यानंतर मग ध्यानधारणा, यापुढे योगाभ्यास, पुढे निर्गुणत्व आणि शेवटी 'अहं ब्रह्मास्मि' या अवस्थेत घेऊन जातो. हिच खरी ओळख आत्मज्ञानी साधू पुरुषाची असते. पण जो स्वतः या बाबतीत अज्ञानी असतो. तो आपल्या अनुयायांना यापैकी कोणत्याही एकाच गोष्टीत गुंतवून ठेवतो. दूसरा विचार सुद्धा करू देत नाही. कारण पुढचा मार्ग त्यालाच माहित नसतो, तर तो आपल्याला काय सांगणार ? हा यक्ष प्रश्नच आहे. तेव्हा साधकांनी आपल्या गुरुची वरील बाबतीत पडताळणी करुण निर्णय घ्यावा, असा बहुमूल्य संदेश आनंदनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. पुढे आपण दूसरे चरण पाहू या....!
पोटासाठी भलती केली खटपट । अभिमान खट धरूनिया ॥
        आपल्या दुसऱ्या चरणात गुरुवर्य सांगतात, या ढोंगी लोकांनी आपले पोट भरण्यासाठी या नाना प्रकारच्या गोष्टी सुरु केल्या आहेत. यात हजारो पूजा, शेकडो यंत्र, तेवढेच तंत्र अशा निरर्थक बाबी खोट्या अभिमानाने हे लोक करायला सांगतात किंवा करुण घेतात. पैसा मिळवण्यासाठी त्यांची ही सर्व खटपट असते, असे आनंदनाथ जाहिरपणे सांगत आहेत. परमेश्वर परमात्मा हा केवळ शुद्ध भक्ति भावाचा भुकेला असताना हे लोक दुष्ट (खट) पणाने आपल्या भक्तांनाच लुटतात, असे आनंदनाथ महाराजांना वाटते. तेव्हा अशा लोकापासून दूर राहणेच योग्य होय.
बोले ब्रह्मज्ञान कागदीच जाण । ऱ्हदय पाषाण खरे खरे ॥
           अभंगाच्या तिसऱ्या चरणात आनंदनाथ सांगत आहेत,  सज्जनहो, हे ढोंगी लोक तुम्हाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतील. आपली प्रत्येक गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतील. बऱ्याच वेळा पुराणांचा किंवा ईतर काही ग्रंथाचा आधार घेऊन सांगतील. पण त्यांचे हे सर्व ज्ञान आणि माहिती ही अर्धवट, अपूर्ण आणि फसवी आहे. पुस्तकी ज्ञान सांगून हे लोक कागदी घोडे नाचवतील मात्र यांचे ज्ञान हे वरवरचे आहे. पाठांतरापलीकडे यांना काहीही आत्मज्ञान नसल्यामुळे यांचे हृदय हे  काळ्याकुट्ट पाषाणासारखे पापी आणि कठोर आहे. यांना दया, ममता, आपुलकी काहीही नाही. आपल्या स्वार्थापुढे यांना सर्व काही तुच्छ वाटते. तेव्हा सावध रहा....! हाच संदेश आनंदनाथ देतात.
सांगुनिया लोकां, नाही घरी साठा।  दयेलागी तोटा सदोदित ॥
            अभंगाच्या चौथ्या चरणात स्वामी सखा आनंद सांगत आहे, हे ढोंगी लोक फक्त दूसऱ्यांना चांगूलपणाचा सतत उपदेश करतात. धर्म-अधर्म, पाप-पुण्य याच्या गोष्टी सांगतात.  पण यांच्या स्वतः च्या घरात किंवा स्वतः यांच्यात मात्र नेहमी या गोष्टीचा अभाव असतो. स्वतः च्या फायद्यापुढे यांना काहीही आठवत नाही. आपल्या प्रवचनातून नेहमी दया धर्म, प्रेमभावाचे धडे देणारे  हे लोक स्वतः मात्र कधीही दया ठेवून वागत नाहीत. दयेचा नेहमी तोटा असतो तो यांच्याकडेच !  तेव्हा अशा निर्दयी लोकापासून कायम सावध राहा, असे वारंवार आनंदनाथ सांगत आहेत.
आनंद म्हणे ऐसे बहू झाले संत । धने भ्रमविले जगामाजी ॥
         आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात आनंदनाथ सांगतात की, बाबांनो असे ढोंगी, फसवे, वासनांध स्वतः ला संत म्हणून घेणारे दुष्ट लोक या जगात खुप झाले आहेत, सगळीकडे यांचेच पेव फूटत आहे. जिकडे जाल तिकडे तुम्हाला हे ढोंगी लोक भेटतील. कलीच्या प्रभावापेक्षा आपल्या अज्ञानाने दिवसेंदिवस या ढोंगी लोकांत भर पडत आहे. आपणच यांना दान स्वरूपात जे धन देत आहोत, याचाच वापर करुण हे लोक आपले खरे स्वरूप लपवून ठेवत आहेत. आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाला  आपल्याकडून घेऊन हे लोक ऐषोंरामात जीवन जगत आहेत, लोकांच्या डोळ्यांत धूळ लोटत आहेत. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करुण आपली पोळी भाजून घेत आहेत. तेव्हा अशा ढोंगी लोकांना एक रूपयांची सुध्दा देणगी देऊ नका. अशा लोकांपासून आपली सुटका करुण घ्या. आपले स्वामी महाराज हे परब्रह्म आहेत, परम दयाळू आहेत. त्यांना कशाचीही आवश्यकता नाही. स्वामींना कुठलेही दान नको, किंवा कोणीही मध्यस्थ नको. तेव्हा आधे-मधे कोणाच्या नादी लागण्यापेक्षा सरळ स्वामींना शरण जा. ते निश्चित तुम्हाला तारतील. असा स्पष्ट, सरळ व सत्य संदेश आजच्या अभंगातून आनंदनाथ महाराजांनी आपल्याला दिला आहे. याचा सर्वानी अंगिकार करावा. 
              स्वामी भक्तांनो, आजच्या अभंगातून आनंदनाथ महाराजांनी ढोंगी लोकांची लक्षणे सांगून, आपण अशा लोकांना कसे ओळखावे व त्यांना कसे दूर ठेवावे, याचे अनमोल ज्ञान दिले आहे. याचा आपल्या प्रत्येकाला निश्चित उपयोग होईल.
          तेव्हा भक्तांनो, यानंतर कुठेही दान देण्यापूर्वी नक्कीच विचार करा. आपले दान हे सत्पात्री जाऊ द्या. कुठेही दान देण्या अगोदर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरजू, गरीब व्यक्तीला मदत करा. भुकेल्याला अन्न द्या. निराधाराला आधार द्या. गरजूला कपडे द्या. गरीब विद्यार्थ्याला आवश्यक साहित्य देऊन मदत करा. यातून मिळणारे समाधान तर खुप मोठे आहेच ! आणि अशी मदत केल्याने मिळणारा परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा कोट्यावधी रूपयांची पूजा करुण ही मिळणाऱ्या पुजेपेक्षा कोटीपटीने जास्त मोठा व जास्त महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ कुठल्याही मंदिरात कधीच दान देऊ नये, असा नाही तर दान देताना अगोदर गरजूला द्या, किंवा काही भाग गरजूसाठी व काही भाग योग्य धार्मिक ठिकाणी द्या. जेणेकरून आपण दिलेले दान योग्य ठिकाणी व योग्य कार्याला जाईल. तेव्हा स्वामी भक्तांनी याचा विचार करुण योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा. ही नम्र विनंती.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।

सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥



लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन