परब्रह्म भगवान श्री स्वामींची पूजा व भक्ति कशी करावी ?



 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 09 वे
(भाग दूसरा)
परब्रह्म भगवान श्री स्वामींची पूजा व भक्ति कशी करावी ?
 या पूर्वीच्या पहिल्या भागात आपण स्वामींची सेवा कोणती करावी ? याची माहिती घेतली. तर आता या दुसऱ्या भागात आपण स्वामींची पूजा भक्ति कशी करावी याची माहिती घेणार आहोत.
स्वामी भक्तांनो,

      आजच्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी  आपण कालच्या लेखामुळे अनेक स्वामी भक्तांच्या मनात निर्माण झालेला एक संभ्रम दूर करू या ! कालचा लेख वाचून बरेच जण गोंधळून गेले व त्यांना असा प्रश्न पडला की, स्वामींचा मुख्य आधारभूत ग्रंथ हा जर 'श्री गुरुलीलामृत' आहे, तर मग आम्ही वाचत असलेले ईतर ग्रंथ योग्य आहेत की नाही ? किंवा आम्ही हे ग्रंथ वाचावे की नाही ? आदि. आदि. अशी शंका निर्माण झालेल्या त्या सर्व स्वामी भक्तांना एकच गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो, बंधुनो असा विचार ही मनात आणू नका की, तुम्ही काही चूकीच करत आहात. कारण रस्त्यावर पडलेल्या एखाद्या साध्या कागदावर जरी 'श्री स्वामी समर्थ' ही दिव्य षडाक्षरे लिहिलेली असतील, तर त्या यत्किंचित कागदाला ही वेदाएवढी किंमत प्राप्त होते. अन त्यावरील 'श्री स्वामी समर्थ' हे नाव वाचणाऱ्याची जीवन नौका सहज तरते. एवढे स्वामी नामाचे माहात्म्य आहे. आपण तर कोणते का होईना स्वामींच्या चरित्राचे वाचन करत आहात. मग ते चुकीचे कसे असेल. आपण जे करता ते योग्यच आहे ! त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता आपण पूर्वी सारखेच आपल्या नेहमीच्या ग्रंथाचे वाचन सुरु ठेवा. त्याने निश्चितच तुमचे कल्याण होईल. फक्त वर्षाकाठी किमान एक वेळा 'श्री गुरुलीलामृत' अवश्य वाचा. ज्यामुळे आपल्याला स्वामींचे सत्य स्वरूप आणि स्वामींचे सामर्थ्य समजेल. ज्यांना ईतर कोणताही ग्रंथ वाचने शक्य नाही, त्यांनी श्री स्वामी स्तवन व स्वामी स्तोत्र स्वामींच्या नामस्मरणासह वाचावे. एवढाच उद्देश्य कालच्या लेखामागचा होता आणि आहे. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी मनातील सर्व शंका दूर करुण स्वामींची सेवा पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी, हिच नम्र विनंती.
         आता आपण आपल्या मुळ विषयाकडे वळू या ! स्वामी  भक्तीचे ज्ञान घेऊ या. सज्जनहो, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण परब्रह्म आहेत. त्यामुळे त्यांचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला परब्रह्म तत्व समजून घ्यायचे असेल तर अगोदर आत्मा, परमात्मा आणि परब्रह्म या आध्यात्मिक संकल्पना समजून घ्याव्या लागतील. अगोदर त्या जाणून घेऊ. शरीरावर ज्याची सत्ता चालते त्याला आत्मा म्हणतात, सर्व आत्म्यावर ज्याची सत्ता चालते त्याला परमात्मा म्हणतात आणि या परमात्म्या सह संपूर्ण ब्रह्माण्डावर ज्यांची सत्ता चालते त्यांना परब्रह्म म्हणतात. हे एकमेद्वितीय परब्रह्म तत्व म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तेव्हा आपण या परब्रह्म तत्वाची भक्ती केली म्हणजे सर्व देवतांची भक्ति केल्यासारखेच आहे, ईतर सर्व काही प्राप्त झाल्यासारखेच आहे. सर्व तीर्थ, सर्व देवता या स्वामींच्या चरणी नतमस्तक असताना आपण स्वामी चरण सोडून इतरत्र धावण्यात काहीच अर्थ नाही. उलट 'भाव अंतरी यथार्थ । देव देणार समर्थ ।। याचा अंगिकार करणे अगत्याचे आहे. चला तर मग स्वामी भक्ति कशी करावी हे पाहू या !
         स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मुर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की, स्वामींची मुर्ती घरात ठेऊ नये. कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते. इत्यादि. इत्यादि. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्विकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपूऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावनाच चूकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भिती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटी असताना शास्त्रशुद्ध पुजेचा कोणताही आग्रह धरला नाही, फक्त शुद्ध भक्तिभाव पाहितला. त्यावेळी तर स्वामींची पूजा व आरती ही सुद्धा स्वामींच्या इच्छेने होत असे, स्वामी कधी प्रेमाने पूजा स्विकारत तर कधी पूजा करू ही देत नसत. कधी पूर्ण आरती म्हणू देत, तर कधी एक, दोन असा बोटाने ईशारा करुण एक किंवा दोनच आरतीचे कडवे म्हणायला परवानगी देत. जर इच्छेविरुद्ध कोणी काही करायचा प्रयत्न केला तर तो उधळून लावीत. यातून स्वामी हेच दाखवून देत की, माझ्यासमोर कर्मकांडाचा बाजार नको, तर मला शुद्ध प्रेम आणि भक्तीभाव पाहिजे आहे, बाकी काही नको.  यातून आपण योग्य ते शोध आणि बोध घ्यावा. स्वामींना हेच पाहिजे स्वामींना तेच पाहिजे, या निरर्थक बाबी टाळून जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ति व सेवा करावी.
        दूसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी ? कारण स्वामींच्या मुर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच स्वामींच्या प्रतिमेबद्दल काही लोकांनी गैरसमज निर्माण केलेले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू.....!
          अनंतकोटी  ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैसमज व त्यावर खुलासा....!
1) स्वामींची प्रतिमा (फोटो) फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड (गोटी) असलेली नको.
2)स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको.
3) स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको.
4) स्वामीं महाराज उभे असलेली प्रतिमा नको.
           कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का ? तर मुळीच नाही! वरील सर्व गैरसमज हे धाधान्त खोटे व निर्रथक आहेत, कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्यांच परब्रह्म स्वरूप व ब्रह्माण्डनायकत्वच अमान्य करण्यासारख आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे, आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते, तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात, जिच्यात 33 कोटि देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा हि पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. अन सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्यकाळात ज्या भागीरथी गायीला क्षणभर ही अंतरू दिले नाही, तिच्या मृत्युनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करुण समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फ़ोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत. त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करु नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्या पेक्षाही ही मोठा आहे. स्वामींच्या लीलाकाळात श्री बाळापा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. पण त्यांच कधीच काही अहित झाल नाही. तर मग त्यांचे कल्याण करुन त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील, असा विचार मनात आणने ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल !  एवढेच काय अगदी अलिकडे सदगुरु पिठले महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा स्वामींच्या प्रतिमेविषयी कुठलेही गैरसमज नव्हते, किंवा कधीही सद्गुरु पिठले महाराजांनी स्वामींच्या या प्रतिमा पूजा व या पूजू नका, असा भेदवाचक साधा उल्लेख ही कुठे केला नाही. फक्त स्वामींचे अधिष्ठान ठेऊन स्वामींची सेवा करा. असाच उपदेश त्यांनी आयुष्यभर दिला. याउलट नाशिक मधल्या आपल्या 15-20 वर्षाच्या वास्तव्यात पिठले महाराजांच्या घरातील स्वामींचा दरबार हा दक्षिणाभिमुख होता. ही सत्य बाब वास्तुशास्त्राचा विनाकारण बाऊ करणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. असो. तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करुण, जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करुण आपले कल्याण करुण घ्यावे, ही नम्र विनंती.....!
            स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मुर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींना रोज मुर्ती असेल तर स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. दिप अगरबत्ती ओवाळून, आपण जी भाजी भाकरी खातो, त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा. एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर, पेढ़े किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. सकाळी उठल्या बरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरुन घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणी मात्राबद्दल दया असू द्या. कुणाबद्दल ही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे, हिच भावना सदैव असू द्या. काही कारणास्ताव एखादे दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्या ऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडापेक्षा स्वामींचा ध्यास महत्वाचा आहे.
       यासोबत रोजच काही वेळ तरी स्वामींचे ध्यान नक्की करा. ध्यान करताना एकांतात व शांततेत डोळे बंद करुण स्वामींच्या स्वरूपाचे ध्यान करा. डोळ्यासमोर स्वामींची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी मानस पूजा ही अवश्य करा. म्हणजे सगुण स्वरूपाची पूजा करत निर्गुण निराकार स्वामी देवांचा ध्यास धरत धरत स्वामी स्वरुपात एकरूप व्हावे, जेणेकरून हळूहळू आपोआपच पूजा- अर्चा, सोहळे-ओहळे, व्रते-नियम या पलिकडे असणारा परब्रह्म आपल्याला मुळ स्वरूपात दिसेल. जिथे कोणताही नियम नाही, जिथे कोणतेही व्रत नाही. पूजा नाही आणि पूज्य ही नाही ! साध्य ही नाही आणि साधना ही नाही ! आहे तो केवळ आत्मानंद ! सर्वव्यापक पूर्णब्रह्म ! अन त्याच्याशी एकरूप झालेला सत् चित आनंद स्वरूप आपला आत्मा. ही अवस्था प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ति मिळणे होय. आणि ही अवस्था कर्मकांडाने कधीही प्राप्त होत नाही. कर्मकांड आणि मुर्ती, प्रतिमापूजा या केवळ एका विशिष्ट अवस्थेपर्यंत एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत. यापालिकडे त्यांचा काहीही उपयोग नाही. जसा प्रवासात वाहनाचा उपयोग अंतर वेगाने कमी होण्यासाठी आवश्यक ठरतो, अगदी तसाच वरील गोष्टिचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी करायचा असतो. त्यात अडकून पडायचे नसते. जसे आपले इच्छित स्थळ आल्यावर प्रवासातील वाहनाचा त्याग करावा लागतो, तसे न केल्यास आपण आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकत नाही तर इतरत्र भटकत फिरतो. अगदी तसेच आपण योग्य वेळी कर्मकांडातून बाहेर पडलो नाहीत, तर शेवटपर्यंत त्यातच अडकून पडतो. याने ना प्रपंच साधतो ना परमार्थ. उलट महात्प्रयासाने मिळालेला मनुष्य देह वाया जातो आणि मग परत सुरु होतात लक्ष चौऱ्याऐंशी योनीच्या फेऱ्या. म्हणजे परत भटकंती. तेव्हा जिज्ञासु भक्तांनी आपल्या पुढील आध्यात्मिक वाटचालीचा विचार करून योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा. हिच अंतरीची प्रार्थना ! 
            स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने स्वामींची पूजा भक्ति कशी करावी, यावर थोडे विवेचन केले आहे, तसेच आध्यात्माचा मुळ गाभा असलेला निर्गुण निराकार पूर्णब्रह्म श्री स्वामी देव यांच्या प्राप्तीचा मार्ग सांगणाऱ्या विषयाला थोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न ही त्याच स्वामींच्या कृपेने केला आहे. हा विषय तसा खुप गूढ आणि खुप सखोल आहे, स्वामी इच्छेने भविष्यात कधीतरी त्यावर नक्कीच चर्चा करु. आता मात्र इथेच थांबून सर्वव्यापक सर्वेश्वर निर्गुण निराकार पूर्ण परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांचे ध्यान करून त्यांचेच भजन करू !
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥



लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन