॥ अशुभ तिथी शुभ होती । स्वामीचरणी राहाता प्रीती ॥



 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 08 वे
अशुभ तिथी शुभ होती  स्वामीचरणी राहाता प्रीती 
स्वामी भक्तांनो,
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडनायक आहेत. त्यामुळे ब्रह्मांडातील सर्व दृश्य अदृश्य गोष्टीवर त्यांचे प्रभूत्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडातील एक ही गोष्ट त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर नाही. सर्व देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर हे स्वामीं आज्ञेचे त्वरेने पालन करतात. प्रत्यक्ष काळ हा सुध्दा स्वामींच्या चरणाचा दास आहे. तो पडेल ती स्वामी आज्ञा पाळण्यास सत्वर तयार असतो. हे आपण स्वामी वैभव दर्शन 02 मध्ये पाहितलेले आहे. असे असताना सुध्दा काही जण विनाकारण ही वेळ शुभ, ही अशुभ, हा दिवस चांगला, हा वाईट, या दिवशी हे कार्य करा, त्या दिवशी हे करू नका. असे काही गोड गैरसमज पाळताना दिसतात. हे पुर्वापार चालत आलेल्या परंपरेमुळे असो किंवा आपले अज्ञान असो. कारण काहीही असो. मात्र या चांगल्या वाईट काळाचा, शुभ अशुभ वेळेचा खुप मोठा पघडा आपल्या मनावर आहे, हे मात्र नक्की.

एकीकडे स्वामी परब्रह्म आहेत, देवाधिदेव आहेत. असे आपण स्वत:च मानतो. अन् दुसरीकडे मोठ्या दिमाखाने आपण हे गैरसमज पाळतो. हे गैरसमज पाळताना, काळ, वेळ हे स्वामींचे दास आहेत, हे आपण साफ विसरतो. नकळतपणे स्वामींना दुय्यम मानतो. असे फक्त आपणच करतो, असे नाही. तर ही प्रथा प्रत्यक्ष स्वामी भगवान अक्कलकोटी विराजमान असताना त्याकाळी सुध्दा प्रचलित होती. कारण फार पुर्वीपासून आपल्या मनावर याचा ठसा उमटलेला होता. आजही आहे. याचा विचार करूनच स्वामी सखा श्री आनंदनाथ महाराजांनी नेमकी ही गोष्ट हेरली. याचा अभ्यास केला. आणि स्वामींच्या खऱ्या स्वरूपाला विसरलेल्या किंवा त्याची जाणीवच नसलेल्या भक्तांना आपल्या पुढिल अभंगातून असे स्पष्टपणे बजावले की, बाबांनो स्वामी भक्तांना सर्व काळ, सर्व वेळ ही शुभच असते. स्वामी पुढे अशुभ असं काहीचं नाही. कारण सर्व शुभांचे शुभ आणि अशुभाचे ही शुभ हे स्वामींच आहेत. हे सर्व भक्तांच्या मनावर बिंबवले. आज आपल्या मनातील या गोष्टी दूर करण्यासाठी आपण ही आनंदनाथ महाराजांचा हा अभंग पाहू या…..
अशुभ तिथी शुभ होती  स्वामीचरणी राहाता प्रीती ॥1॥
नवग्रह ते अधिन  सद्गुरू पायी ज्याचे मन ॥2॥
काळ झाला रे अंकित  वेळ येई शरणांगत ॥3॥
आनंद म्हणे शुभ वेळ  स्वामीदासा सर्व काळ ॥4॥
स्वामी भक्तांनो जर तुम्ही स्वामींचे सेवक आहात, जर तुमचा स्वामीवर पुर्ण विश्वास असेल.तर मनातील सर्व किंतु परंतु काढून टाका. ही तिथी शुभ, ही तिथी अशुभ असा विचार सुध्दा करू नका. कारण आपले स्वामी हे पुर्ण परब्रह्म परमेश्वर आहेत. त्यामुळे स्वामी भक्तांनी फक्त स्वामी चरणी प्रीती ठेवावी. जर आपली स्वामीचरणी पुर्ण श्रध्दा असेल तर अशुभ तिथी सुध्दा अत्यंत शुभ होते. एवढा स्वामीं चरणांचा महिमा आहे. तेव्हा मनातील सर्व संशय दुर करा आणि स्वामींचे नाव घेऊन तिथीचा विचार न करता कुठल्याही कामाची सुरूवात करा. बाकी काय करायचे ते स्वामी पाहातील.
दुसरी गोष्ट म्हणजे नवग्रहाचा विचार. आपण सर्व जण ज्योतिष्य शास्त्र मानतो. त्यानुसार वाटचाल करतो. काहीजण पंचाग पाहितल्या शिवाय घराबाहेर पाऊल सुध्दा ठेवत नाहीत. एवढे ग्रह ताऱ्याचे खुळं आपल्या मनात पक्के बसलेले आहे. हा ग्रह चांगला, तो वाईट, हा ग्रह वक्री, तो निच स्थानी, याची दशा त्याची साडेसाती. असे अनेक बाऊ आपल्या मनात घरं करून आहेत. आपण या ग्रह ताऱ्यांच्या बंधनात एवढे स्व:तला जखडून घेतले आहे की, त्याने जरी आपल्याला सोडले, तरी आपणच त्याला सोडायला तयार नाहीत. हे रत्न वापरं, ते रत्न वापरं. हा उपाय कर, तो उपाय करं. असे हेलपाटे सुरू होतात. यात आपली मानसिक, आर्थिक, सामाजिक व कौंटुबिक स्वरूपात फार मोठी हानी होते. मात्र आपल्या मनातील नवग्रहाचे भूत काही जात नाही. ते आपल्या मानगुटीचं बसलेलं असतं. तेव्हा अशा ग्रहताऱ्यांच्या चक्रात अडकून पडलेल्या अज्ञानी जीवांना आनंदनाथ महाराज सांगत आहेत की, बाबांनो  ज्या नवग्रहावर हे सर्व ज्योतिष्य शास्त्र आधारलेलं आहे, ते सर्वच्या सर्व ग्रह तारे हे स्वामींच्या आधिन म्हणजे आज्ञेत आहेत. हे सर्व ग्रह स्वामी आज्ञेशिवाय काहीही करत नाहीत. तेव्हा स्वामी भक्तांनी अशा ग्रहाची भिती बाळगण्याचे काहीच काम नाही. ग्रहाचा अधिपती हा आपला सद्गुरू आहे. तेव्हा या सद्गुरूंच्या पायी मन रमवा. सर्व ग्रह आपोआप तुम्हाला अनूकुल असे होतील. ‘समर्थांचिया सेवका वक्र पाहे, असा या भूवरी कोण आहे’ ही उक्ती सतत ध्यानात ठेवा, आणि ग्रहताऱ्यांचे खुळं डोक्यातून काढून टाका. कारण ग्रह तारे किंवा ज्योतिष्य शास्त्र हे फक्त आयुष्याची दिशा काही प्रमाणात स्पष्ट करतात. पण आपले सद्गुरू तर आपला पुर्णपणे योगक्षेम वाहतात. तेव्हा नवग्रहाचे अधिपती स्वामी सोबत असताना काळजी करण्याचे काहीच कारण नाही.
सर्वांना एकाच गोष्टीची भिती वाटते. ती म्हणजे मरणाची. आपण सर्वजण एक दिवस अवश्य मरणारच आहोत हे सर्वांना माहित आहे. मात्र आपण मरावे, असे कुणालाच वाटत नाही. जन्म मरण हे काळाच्या हातात आहे. हा अधिकार काळाकडे दिलेला आहे. काळ आपल्या पुर्व संचिताप्रमाणे जन्म मरण याची काळ वेळ ठरवतो. हा काळ ज्यांच्या आज्ञेने काम करतो. किंवा तो ज्यांच्या अधिन आहे, ते आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. तेव्हा निदान स्वामी भक्तांनी तरी काळाला भिण्याचे काहीच कारण नाही. काळ आपले कधीच काही अहित करू शकत नाही, कारण आपण  स्वामींचे शिष्य आहोत. आपण स्वामी चरित्रात रोज वाचतो की स्वामींनी एका क्षणात तात्यासाहेबांचा मृत्यू समोरच्या बैलावर घालवला. यातून तात्यांना जीवनदान व बैलाला सद्गती मिळाली. तेव्हा आपल्या ठराविक वेळे अगोदर काळ आपले काहीही अहित करू शकत नाही. उलट जर स्वामींनी ठरवले तर स्वामींच्या कृपेने आपली वेळ काही काळापुरती तरी निश्चितच पुढे जावू शकते. पण एक दिवस सर्वांनाच जायचे आहे. हा सृष्टिचा नियम आहे. त्यामुळे स्वामींनी अक्कलकोटात असताना असंख्य भक्तांचे प्राण जरी वाचवले असले तरी ते काळाच्या कर्तव्याआड सुध्दा गेले नाहीत. उलट ज्या भक्तांची जायची वेळ जवळ आली. तेव्हा त्या भक्तांचे त्यासाठी मन घट्ट करण्याचे काम स्वामी करीत. त्यांच्या परलोकीच्या कल्याणाचे कार्य करीत. एवढी दयाळू आपली स्वामी माऊली आहे. तेव्हा स्वामी भक्तांनी स्वामी अधिन असलेल्या काळाला भिऊ नये अथवा ज्या स्वामी पुढे वेळ ही शरणागत भावनेने उभी राहून भक्तांचे प्राण हरण करण्याची परवानगी मागते, त्या वेळेची ही भिती बाळगू नये. जो पर्यंत स्वामी परवानगी देणार नाहीत, तोपर्यंत प्रत्यक्ष काळ हा सुध्दा तुमच्या केसाला ही धक्का लावणार नाही, आणि जेव्हा स्वामी परवानगी देतील, तेव्हा त्यावेळी प्रत्यक्ष स्वामींनीच तुमच्या साठी स्वामी लोकांतील दरवाजे उघडले असतील. आणि हा काळच आपल्याला सन्मानपुर्वक स्वामी दरबारी घेऊन जाईन. तेव्हा मग वेगळ्या मोक्षाची वा मुक्तीची काही गरजच नाही. आपण कायमचे स्वामींचे होऊन जाऊ.
आपल्या अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराज सांगत आहेत की, स्वामी भक्तांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत, स्वामी चरणांचे दास आहोत. तेव्हा आपल्या मनातील सर्व गैरसमज काढून टाका. ही वेळ चांगली, ही वेळ वाईट. ही तिथी शुभ ती अशुभ. असा कसलाही विचार आपल्या मनात आणू नका. आपण स्वामींचे सेवक आहोत, आपल्यासाठी सर्व वेळ ही शुभ वेळच आहे. अशुभ असे काहीही नाही. तेव्हा सर्वांचे मंगल करणाऱ्या सर्वं मंगल स्वामींना शरण जा. आयुष्याचे सोने करा. हीच शिकवण आपल्याला आजच्या अभंगातून आनंदनाथ महाराजांनी दिलेली आहे.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन