भक्तकाज कल्पद्रुम परब्रह्म स्वामी महाराज

bhaktkaj kalpdrum swami maharaj


 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 06 वे
भक्तकाज कल्पद्रुम परब्रह्म स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो, सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत या सर्वांच्या पलिकडे असणारे आपले स्वामी महाराज आहेत. ते सर्वांव्याप्त असूनही  सदैव नामनिराळेच राहतात. त्यांना जन्म मृत्यू, जरारोग्य हे कधीही बाधू शकत नाही. 1878 मध्ये जरी त्यांनी समाधी घेण्याचे नाट्य रचले असले, तरी त्यानंतर केवळ तिसऱ्याच दिवशी स्वामी महाराज हे अक्कलकोट जवळच्या निलेगावी आपल्या सर्वं भक्तजनांसह प्रकट झाले होते. निलेगावच्या पाटलाला आम्ही शनिवारी तुझ्या घरी येऊ, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र  त्याआधीच्याच मंगळवारी सांयकाळी त्यांनी समाधी  नाट्य रचले. त्याकाळी तातडीने संदेश पोहोचविण्याची काहीच यंत्रणा नसल्यामुळे याबाबत निलेगावात काहीही महित नव्हते. परंतु आपल्या भक्ताला दिलेल्या वचनाप्रमाणे स्वामी महाराज हे समाधीनंतर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस निलेगावी प्रकट झाले. शुक्रवारी तर ते आपल्या बाळाप्पा, भुंजगा, श्रीपाद भट, ज्योतिबा पाडे अशा सर्व जेष्ठ सेवेकऱ्यांसह ईतर 50-60 भक्तांचा लवाजामा घेऊन उपस्थित होते. यावरून आपल्याला स्वामींच्या सामर्थ्याची महती कळते.
इकडे अक्कलकोटात स्वामी  विरह दु:खात आकंठ बुडालेला भक्तसागर त्यांनी जशाचा तसा दुसरा निर्माण करून निलेगावात प्रवेश केला. हे केवळ स्वामींनाच शक्य आहे. कारण ते पुर्ण परब्रह्म परमेश्वर आहेत.
याच  पुर्ण परब्रह्म स्वामी महाराजांनी अनेक युगात वेगवेगळे अवतार धारण केले. प्रत्येक अवतारात नाव आणि रूप जरी वेगवेगळे असले तरी अंतरंगीचा परमेश्वर हा एकच होता. तोच पुढे आपल्या भक्तांसाठी अक्कलकोटी स्थिरावला. अक्कलकोटचा श्री स्वामीराज समर्थ म्हणून नावारूपास आला. अखिल विश्वात पुर्ण परब्रह्म आपल्या मुळ स्वरूपात प्रथम भक्तांसमोर  प्रसिध्द झाला, तो इथेच. हे अक्कलकोट वासियांसह आपल्या सर्वांचे महाभाग्यच म्हणावे लागेल. कारण यापुर्वी तो कधीही आपल्या मुळ स्वरूपात आला नव्हता, तर तो आपल्या अंश अवतारातच प्रकट होत होता.अक्कलकोटी मात्र तो प्रत्यक्ष रूपात आला. त्याला जन्म ही नाही, अन् मृत्यू ही नाही. तो या सर्वांपेक्षा वेगळा आहे. फक्त तो प्रसंगानुप आपल्या भक्तांसाठी प्रकट होत असतो. भक्तांवर संकट आले की तो कुणाच्या तरी माध्यमातून येतो, ही कवी कल्पना नाही, तर याला प्रत्यक्ष स्वामींचीच साक्ष आहे, श्री स्वामी  महाराज अक्कलकोटात वावरताना  नेहमी म्हणत, ‘कधी मीच राम होतो’, ‘कधी मीच कृष्ण ही होतो.’ स्वामी केवळ असे म्हणण्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अक्कलकोटी  येणाऱ्या भक्तांना त्यांच्याच आराध्य देवतेच्या स्वरूपात अनेक वेळा दर्शन दिले. कोणाला स्वामींत श्रीराम दिसले, कोणाला सुदर्शन धारी श्रीकृष्ण दिसले. कुणाला ते पंढरीचा पांडूरंग दिसले. जैसा ज्याचा भाव तैसा भेटे तया स्वामीदेव अशी महती स्वामींची आहे. असा आपला सर्वव्यापी परब्रह्म आहे.
आजचा आपला अभंग ही याच धर्तीवरचा आहे. आनंदनाथ महाराजांनी आजच्या आपल्या अभंगात प्रत्येक युगायुगात प्रंसगानुरूप स्वामींनी घेतलेल्या अवताराचे स्मरण स्वामींना करून दिले आहे. प्रत्येक अवतारात उध्दार केलेल्या भक्तांचा उल्लेख करून,  या सर्वांचा उध्दार आपण केलात मग आम्हालाच का दूर लोटता ? असा मार्मिक प्रश्न ही स्वामींना केला. तेव्हा आपण भक्त आणि भगवंत यातील सात्विक भांडण हे आता आनंदनाथ महाराजांच्याच शब्दात पाहू या !
का हो केले निष्ठूर मना  सांगा आता कृपाघना  ॥1॥
इभ स्मरणी तारीला  नाही आठव कैसी तुला ॥2॥
भक्त प्रल्हाद तारिसी  नरहरी होणे घडले तुसी ॥3॥
काय सांगू हा विचार  पापी अजामीळ पार ॥4॥
ध्रुव अढळ की झाला  उपमन्यु बाळ ध्यायियेला ॥5॥
किती आठवू दातार  तुम्ही केले उपकार ॥6॥
देवा कृपावंत होसी  कृपे जिवासी तारिसी ॥7॥
आनंद म्हणे श्रीगुरूनाथा  सख्या ऐकावे समर्थ ॥8॥
आपल्या अभंगाच्या प्रारंभीच आनंदनाथ महाराज स्वामींना विचारत आहेत की, हे कृपाघना, भक्तवत्सला, करूणानिधान स्वामीराजा ! तुम्ही आपले मन असे का निष्ठूर केले आहे ? तुम्हाला आमचा का विसर पडला आहे ? आमचे नेमके काय चुकले आहे ? ज्यामुळे तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाही आहात.  निदान आमची सेवा कुठे कमी पडली, हे तरी सांगा. पण असे आम्हावर निष्ठूर होऊ नका. तुम्ही तर भक्तवत्सल भक्ताभिमानी आहात. दयेचे सागर आहात. असे आम्हाला टाकून जावू नका. आम्हाला अव्हेरू नका. हे तुम्हाला शोभत नाही. कारण तुम्ही ममतेचे उगम स्थान आहात.  हे स्वामी राया ! आयुष्यभर मनोसोक्त विहार करणाऱ्या, संसार सुखात रममाण असणाऱ्या इभाला म्हणजे गजराज गजेंद्राला आपण केवळ अंतकाळच्या एका आरोळीने व एका कमल पुष्पाच्या तुच्छ भेटीने प्रसन्न होऊन त्याला मगरीच्या तावडीतून वाचवून जीवनदान दिलेस. अन् आमच्याच बाबतीत तुला कसा काय विसर पडला ?
भक्त प्रल्हादाला अनंत अडचणीतून सोडवलेस, एवढेच काय तर त्याच्यासाठी जगावेगळा अविष्कार धारण करून श्री नृसिंह म्हणून प्रकट झालास आणि हिरण्यकश्यपू दैत्याचा वध ही केलास. हे कृपाघना एवढ्यावरच थांबला नाहीस, तर अंतकाळापर्यंत विषयात रममाण असणारा, वारांगणेशी संग करणारा महापापी अजामीळ. पण एवढ्या मोठ्या महापाप्याचाही अंतकाळच्या एका हाकेने उध्दार केलास. ही हाक सुध्दा त्या पापात्म्याने तूला नाही तर आपल्या मुलाला मारली होती. मात्र तेथे तू धावत जाऊन त्याचा उध्दार केलास. एवढा कनवाळू तू आहेस.  हे दयाघन प्रभो, स्वत:च्या वडिलांनी आणि सावत्र आईने ही झिडकारलेल्या ध्रुव बाळाला तू जगावेगळे अढळ पद देऊन तारलेस. गुरूभक्त उपमन्यूचे ही कल्याण केलेस. हे स्वामीराया ! एवढा तू मायाळू आहेस. दयाळू आहेस. असे किती किती म्हणून प्रसंग आठवावे की, ज्यात तू आपल्या सर्व दातार वृत्तीने भक्तांना हवे ते अगदी सहज देतोस. त्यांच्यावर करूणा दाखवतोस, अनंत उपकार करतोस. आजवर ज्यांच्या ज्यांच्यावर तू कृपा केलीस, किंवा कृपावंत झालास त्या सर्व जीवांचे रक्षण करून त्यांना अंती सद्गती मिळवून दिलीस. केवढे हे तुझे थोरपण ! किती ही तुझी आपल्या भक्तावरची ममता ! आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी सुध्दा तुझ्या कृपेची थोरवी वर्णिता येणार नाही.
तेव्हा हे करूणानिधान प्रभो, हे सख्या समर्था ! आमच्यावर असा निष्ठूर होऊ नकोस. आम्हाला असे झिडकारू नकोस. आम्हाला असे दूर ही लोटू नकोस. तुझी अगाध माया आमच्या वर ही सदैव ठेव. तुझी अथांग कृपादृष्टी आमच्यावर ही अखंड राहू दे. एवढीच आपूलकीची विनंती आहे. एवढेच आपुल्या पायीच्या दासाचे सांगणे आणि मागणे आहे. असे आनंदनाथ महाराज सांगत आहेत. स्वामी भक्तांनो हा अभंग आपल्याला स्वामींच्या सर्वसाक्षित्वाची ओळख पटवून देणारा आणि सर्वांठायी केवळ स्वामींच आहेत. ही जाणीव करून देणारा आहे. तेव्हा आपल्या सर्व संकट समयी केवळ स्वामींचा धावा करावा. केवळ त्यांनाच शरण जावे. वात्सल्यमूर्ती स्वामी महाराज निश्चितच आपले कल्याण करतील. चला तर मग सर्वेश्वर संचार मुर्ती श्री स्वामींना शरण जावू या आणि त्यांचे प्रेमळ नाम स्मरण करू या !
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !


लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन