आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 03



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 12 वे
आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 03
स्वामी भक्तांनो,
        ढोंगी बुवा-बाबा, पाखंडी धर्मगुरु यांचे सत्य स्वरूप जगासमोर मांडल्यानंतर आता आनंदनाथांनी आपला मोर्चा वाचाळ आणि कर्मठ धर्म पंडितांकडे वळवला आहे. कर्मकांडाचा भयानक आणि अनावश्यक स्तोम माजवणाऱ्या या लोकांना आनंदनाथ सत्य धर्म व शास्त्रशुध्द ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगत आहेत. तत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी एखादी बाब पुढे अलिखित नियम बनून लोकांच्या मनात रुतून बसते. याच रुढी परंपरा नंतर धर्म नियम म्हणून आंधळेपणाने आणि सक्तीने पाळल्या जातात. मुळ ईश्वर सेवा आणि ईश्वर प्राप्ती या गोष्टींना दुय्यम स्थान देऊन हे अनावश्यक नियम आणि कर्मकांड पुढे येते. यातूनच मग उच्च - नीच, दलित सवर्ण, श्रेष्ठ कनिष्ठ, असे निरर्थक आणि अन्यायकारक भेद निर्माण होतात.
याचाच अतिरेक होऊन ज्ञानेश्वर भावंडे वाळीत प्रकरण, शिवराज्याभिषेक विरोध प्रकरण, राज्यश्री शाहू वेदोक्त प्रकरणासारख्या कलंकित घटना घडतात. एवढेच नाही तर याच विवेकशून्य धर्म नियमांमुळे कोटी कोटी बाटलेले हिंदू इच्छेविरुद्ध मुस्लिम झाले, कोटी कोटी पददलित, हरिजन आणि डॉ.आंबेडकरासारखे रत्न स्वधर्म सोडून गेले. पण तरीही अजून या जुन्या जाचक रुढी, परंपरा पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. आजही विज्ञान युगात पूर्णपणे अंधश्रद्धा दूर झालेली नाही. आजही एखादी गोष्ट धर्म नियमाविरुद्ध अनावधानाने जरी झाली, तरीही धर्मच बुडाल्याची स्थिती तथाकथित धर्ममार्तण्ड निर्माण करतात. परंतु एवढा कमकुवत व लेचापेचा आपला धर्म नक्कीच नाही. मुळात धर्म तत्वे अक्षय्य असून धर्म नियम ही कालपरत्वे बदलणारी बाब आहे. हे ध्यानात घेऊन कालानुरूप धर्म नियम हे बदलायलाच हवेत. कारण आपल्यासाठी नियम आहेत, नियमासाठी आपण नाही. पण आपली दहशत व अंकुश लोकांच्या मनावर कायम राहावा म्हणून हे तथाकथित धर्माचे ठेकेदार या गोष्टी लोकांपर्यंत पोहचू देत नाहीत.
         अशाच स्वधर्मनाशी धर्म ठेकेदारांचे डोळे उघडणारा व ईश्वर प्राप्तीचा सत्य आणि शास्त्रशुद्ध मार्ग दाखवणारा आनंदनाथ महाराजांचा आजचा अभंग आपण पाहणार आहोत.
            
स्नान संध्याभार करिती निरंतर । परि न विचार तया माजी ॥1॥
ब्रह्म रूपरूपी नटोनिया गेले । कैसे विटाळले मन तुझे  ॥2॥
संदेहाची बाधा सोडुनिया दुरी । मग संध्या करी निजछंदे ॥3॥
कर्म धर्म योगे दयाधर्म ठेवा । करू नका हेवा आणिकाचा ॥4॥
आनंद म्हणे नाक धरुनिया जप । करणे संकल्प नको नको ॥5॥
           आजचा आपला अभंग स्वामींच्या लाडक्या शिष्याचा आणि साईंबाबांच्या कायम श्रद्धास्थानी असलेल्या सत्पुरुषाचा म्हणजेच स्वामीसखा आनंदनाथ महाराजांचा आहे. आजच्या आपल्या पाच चरणाच्या अभंगातून आनंदनाथ कर्मठ लोकांना त्यांच्या  कृत्याबद्दल जाब विचारुन, परत त्यांना परमेश्वर प्राप्तीचा सत्य मार्ग सांगतात.
स्नान संध्याभार करिती निरंतर । परि न विचार तया माजी ॥
      आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात आनंदनाथ महाराज सांगतात, या अज्ञानी लोकांनी स्वतः ला धर्म नियमात जखडून घेतले आहे. हे यत्किंचित नियम पाळणे म्हणजेच ईश्वर सेवा करणे असे या लोकांना वाटते. या नियमांपोटीच कोणी दिवसातून तीन वेळा स्नान करतात, तर कोणी पाच वेळा. कोणी 10 वर्षापासून त्रिकाल संध्या करतो, तर कोणी 50 वर्षापासून. पण या पलिकडे कोणीही काही विचार करत नाही. स्नान, संध्या करुण शरीराचा बाह्य भाग तर शुध्द होते. मात्र अंतःकरण हे कायम मलिन असते. त्याला शुध्द करण्याचे प्रयत्न कोणीही करत नाही. स्नान, संध्या या प्रतिकात्मक बाबी आहेत, या आपल्याला शरीराप्रमाणेच मन शुध्द करण्याचे सतत स्मरण करुण देतात. दोन तीन दिवस स्नान केले नाही तर शरीराची दुर्गंधी यायला सुरु होते व आपल्या जवळ कोणी फिरकतही नाही. अगदी तसेच आपण रोज 10 वेळा जरी स्नान संध्या करत असू, मात्र मनाची मलिनता जर रोजची रोज दूर केली नाही तर ईश्वर आपल्याला त्याच्या वाऱ्यालाही उभा राहू देत नाही. म्हणून नियमीत स्नान संध्या केली नाही तर चालेल पण मन मात्र नेहमी शुध्द ठेवा. आपले विचार नेहमी उदात्त ठेवा. कोणतीही क्रिया करण्यापूर्वी त्यामागील भावना विचारात घ्या, आंधळेपणाने कोणतीही गोष्ट करू नका. असा महत्वपूर्ण संदेश आनंदनाथ पहिल्या चरणातून देत आहेत.
ब्रह्म रूपरूपी नटोनिया गेले । कैसे विटाळले मन तुझे  ॥
        अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदनाथ सांगतात, बाबांनो सर्व विश्व हे ब्रह्माचीच माया आहे. प्रत्येक गोष्ट ही ब्रह्मस्वरूपच आहे. असे आपणच बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो. यावर प्रवचने सांगत अथवा ऐकत असतो. परमार्थाच्या खुप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण सांगत असतो. मग हा नीच तो उच्च, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ हा भेद उरतो कुठे ? आणि हा भेदच जर निरर्थक असेल तर मग तुमच्या मनात विटाळ कसा ? कसे काय तुमचे मन एवढे विटाळून गेलेले आहे ? एवढे पाप आणि गढूळ विचार जर तुमच्या मनात असतील तर मग तुमच्या स्नान संध्या या नित्यक्रिया काय कामाच्या ? कशाला हा कर्मकांडाचा तमाशा करता ? असा रुढीभेदक थेट सवाल आनंदनाथ आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात.
संदेहाची बाधा सोडुनिया दुरी । मग संध्या करी निजछंदे ॥
             आपल्या तिसऱ्या चरणात स्वामीसखा आनंद सांगतो, बाबांनो तुमच्या मनातील कलुषित विचार बाहेर काढा. सर्वप्रथम आपले मन शुध्द ठेवा. आपल्या अंतःकरणातून सर्व भेदाभेद पूर्णपणे नष्ट करा. हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असा कोणताही संदेह मनात आणू नका. अशा निरर्थक बाबींचा पूर्णपणे त्याग करा. यासर्व भ्रमातून एकदा का तुम्ही पूर्णार्थाने बाहेर आलात की मग हवी तेवढी स्नान संध्या स्वछंदे करा. असे केल्याने मग निश्चित तुम्हाला स्वामी देव भेटेल. परमेश्वर प्राप्ती होईल. अन्यथा नाही. असा सर्वश्रेष्ठ संदेश स्वामीसखा येथे देतो.
कर्म धर्म योगे दयाधर्म ठेवा । करू नका हेवा आणिकाचा ॥
         आपल्या अभंगाच्या चौथ्या चरणात आनंदनाथ सांगतात, सज्जनहो, जर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करायची असेल, माझ्या स्वामी देवांची प्राप्ती करायची असेल, तर मनातील सर्व गैरसमज व कलुषित विचार नष्ट करा. सर्व वाईट भावनांचा त्याग करा. जर काही कर्म करायचे असेल, जर काही धर्म पाळायचा असेल किंवा जर काही क्रिया करायची असेल तर फक्त आणि फक्त दया हेच कर्म करा, दया हाच धर्म पाळा आणि दया हिच क्रिया समजून योगधर्म करा...... बस्स ! एवढ्यानेच तुम्हाला अवश्य ईश्वर प्राप्ती होईल. एवढ्या अल्पशा कर्मानेच तुम्हाला देव दुर्लभ परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज भेटतील. तेव्हा अन्य काही करण्यापेक्षा किंवा अन्य काही निरर्थक धर्म नियमात स्वतः ला जखडून घेण्यापेक्षा केवळ दयाधर्माचे पालन करा, असा साधा, सरळ, सोपा उपदेश आनंदनाथ स्वानुभावातून देत आहेत.
आनंद म्हणे नाक धरुनिया जप । करणे संकल्प नको नको ॥
            अभंगाच्या शेवटच्या चरणात आनंदनाथ सांगतात, सज्जनहो जशी होईल तशी साधी भोळी स्वामींची सेवा भक्ती करा. कुठल्याही नियमात अडकू नका. नाक धरून जप करण्यापेक्षा किंवा कुठलाही संकल्प करण्यापेक्षा सरळ मनाने शरणागत भावनेने स्वामींना शरण जा.....! यातच तुमचे सौख्य सामावलेले आहे. आपल्या सारखे सर्वांना समान माना, सर्वांचा आदर राखा, सर्वांशी दयाधर्माने वागा. यानेच तुम्हाला सर्व काही मिळेल. केवळ स्वामी नाम स्मरणाने सर्व सूखे तुमच्यापुढे हात जोडून उभे राहतील. तेव्हा अन्य काही भानगडित न पडता स्वामी नामाने सर्वस्व प्राप्ती करुण घ्या. असा बहुमोल संदेश अभंगाच्या शेवटी स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज देत आहेत.
          स्वामी भक्तांनो, कर्मकांडाचा अतिरेक किंवा टोकाचा कर्मठपणा याने कधीही परमेश्वर प्राप्ती होत नाही. किंवा अन्य काही लाभ ही मिळत नाही. उलट याने धर्माचे कधीही न भरून येणारे फार मोठे नुकसान होते. हे आनंदनाथ महाराजांच्या या अभंगातून आणि आपल्या देशाच्या  पूर्व इतिहासातून दिसून येते. तेव्हा मागील चुका टाळून आपण पुढील योग्य मार्ग पत्करावा. सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन सर्वांशी ममत्वाने वागावे. अंधश्रद्धा दूर ठेऊन डोळस श्रद्धेने ईश्वर भक्ती करावी. हिच शिकवण आपल्याला आज वरील अभंगातून मिळालेली आहे. सर्वजण यापुढे याचा अंगिकार करतील, तशी सद्बुद्धि आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना मागु या.....! स्वामी नाम चिंतनात रममाण होऊ या.......
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु



लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन