सर्वांन्तयामी सर्वेश्वर स्वामी महाराजांची थोरवी



 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 10 वे
सर्वांन्तयामी सर्वेश्वर स्वामी महाराजांची थोरवी
स्वामी भक्तांनो,
             यापूर्वी स्वामी वैभव दर्शन 09 वे पुष्प भाग एक आणि दोन मध्ये झालेल्या थोड्याशा विषयांतरानंतर आपण आपल्या मुळ विषयाकडे वळू या. स्वामींच्या अंतरंगी एकरूप झालेल्या श्री आनंदनाथ महाराजांच्या भावपूर्ण रचनांचा आनंद घेऊ या.
         काही स्वामी भक्तांनी जिज्ञासेपोटी अशी विचारणा केली की, आपण हे अभंग कोणत्या ग्रंथातून घेतलेले आहेत. जशी तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांची अभंग गाथा आहे, तशीच एखादी आनंदनाथ महाराजांची अभंग गाथा आहे का ? असेल तर हा ग्रंथ आम्हाला वाचायला कुठे भेटेल. इत्यादि. या सर्व जिज्ञासु स्वामी भक्तांना सांगणे आहे की, श्री आनंदनाथ महाराजांची श्री स्वामी समर्थ स्तवन गाथा या नावाने एक अभंग गाथा मागील काही वर्षापूर्वी पुनर्वसु प्रकाशनाने प्रकाशित केलेली होती. ज्यात आनंदनाथ महाराजांच्या उपलब्ध असलेल्या जवळपास 2300 अभंग रचना यात समाविष्ट केलेल्या होत्या. स्वामी भक्तांच्या उदंड प्रतिसादाने ही आवृत्ती अल्पावधितच संपली. नंतर यात संशोधन करुण नवीन आवृत्ती प्रकाशित करण्याचे काम अंतिम टप्यात आहे, ही नवीन आवृत्ती पुढील वर्षभरात आपल्या सर्वासाठी उपलब्ध होईल, असे पुनर्वसु प्रकाशनच्या श्री विवेक वैद्य सरांनी सांगितले आहे. जर आपल्यापैकी कोणाकडे तो पूर्वीचा ग्रंथ असेल, किंवा आपल्या पाहण्यात कुठे आला असेल तर मला अवश्य कळवा. पुढील स्वामी वैभव दर्शनासाठी तो खुप उपयोगी पडणार आहे. 

तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेला ग्रंथ म्हणजे 'आनंदनाथ महाराजांच्या चरित्राचा वेध श्री स्वामी समर्थ दर्शन' हा श्री. संजय वेंगुरलेकर, संजना पब्लिकेशन यांनी लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथात श्री.वेंगुरलेकर यांनी आनंदनाथ महाराजांचे चरित्र, अनेक अभंग, आत्मबोध गीता, मुळ भजनानंद लहरी, स्वामी स्तोत्र, स्वामी स्तवन अशा अनेक बाबीवर प्रकाश टाकून त्या संशोधित स्वरुपात भाविकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. तेव्हा हा ग्रंथ आपल्याला निश्चित उपयोगी पडेल. आपण सध्या श्री स्वामी वैभव दर्शन हे श्री.संजय वेंगुरलेकर यांच्याच ग्रंथातून घेतलेल्या आनंदनाथ महाराजांच्या अभंगाद्वारे उलगडत  आहोत. असो. आता आपण आपल्या अभंगाकडे वळू !
       आजचा आपला अभंग हा स्वामी महाराजांचे थोरपण समजावून सांगणारा आहे. आनंदनाथ महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वामी चरणावर वाहिलेले होते. जीवनभर त्यांनी स्वामी कार्याची पताका ऊंच ऊंच फडकवत नेली. प्रत्येक वेळी स्वामींची आज्ञा शिरसावंद मानली. लाखो भक्तांना स्वामी भजनाला लावले. कितीतरी लोकांचे संसार तारले. हे सर्व करत असताना ते स्वतः च्या सांसारिक जवाबदारीतून ही मागे हटले नाहीत. त्यांनी प्रपंच करत करत परमार्थ साधला. अन स्वामींचे ही त्यांच्या परमार्था एवढेच आशीर्वाद त्यांच्या प्रपंचावरही होते. याची साक्ष म्हणजे वयाच्या 75 व्या वर्षी स्वामी कृपेने त्यांना प्राप्त झालेले पुत्ररत्न हे होय. संसारातून पूर्णपणे विरक्त झालेल्या आनंदनाथांना स्वामींनी 'तूला एक पुत्र होईल..!' असा आज्ञावजा आशीर्वाद दिला आणि आनंदनाथ महाराजांच्या पत्नीला मातृसुख मिळवून दिले. ईतर सर्व जण संसाराच्या भवतापातून सूटण्यासाठी सद्गुरुचे चरण धरतात. इथे मात्र या उलट सद्गुरुनींच स्वतः संसार करण्याची आज्ञा देऊन परीक्षा घेतली, यात श्री आनंदनाथ पूर्ण कसोटीस उतरले. असार संसार करुण सद्गुरु आज्ञा ही पाळली आणि यात अडकून न पडता जीवनमुक्तपणे संसार करून अंतिम परीक्षा ही उत्तीर्ण झाले. धन्य तो सद्गुरु आणि धन्य तो सत्शिष्य...!
            परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या अशा अलौकिक आणि आपल्या बुद्धीक्षमतेच्या पलिकडे कोसोदूर असणाऱ्या लीला घडवण्याच्या सहज स्वभावाचे दर्शन आपल्याला आज पुढील अभंगातून मिळणार आहे. अखिल मानव जातच नाही तर देवांच्या देवानांही या लीला कळण्यास अगम्य आहेत. असा आपल्या 'स्वामीश्रींचा' सहज स्वभाव आहे. एवढे अगम्य आणि अलौकिक असूनही आपल्या भक्तांना ते सहज साध्य आणि भवतारक आहेत. याचीच खात्री आपल्याला आजच्या अभंगातून मिळेल. तेव्हा अशा स्वामी गुरुंचे पुढील वर्णन पाहू या.
ऐसा माझा हा समर्थ । पूर्ण भवतारक कृपावंत ॥1॥
शेषशायी नारायण । तोची माझा स्वामी जाण ॥2॥
धरा भार हरावया । जागे केले श्रीगुरूराया ॥3॥
हरी हर ब्रह्म जाहाले । ज्याचे मायेचे धाकुले ॥4॥
त्याचा पार जाणे कोण । वेद जेथे धरी मौन ॥5॥
आनंद म्हणे हितासाठी । कैसे घेसी हे कासोटी ॥6॥
          आनंदनाथ म्हणतात, माझा स्वामी देव हा भक्तवत्सल, दयाघन, करुणानिधान आहे. अक्कलकोटी वटवृक्षाखाली बसलेली ही सर्वेश्वर चैतन्यमूर्ति सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यास समर्थ आहे. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठीच हा ब्रह्माण्डनायक श्री स्वामी समर्थ हे नाव धारण करुण 'मुळ मुळ वडाच झाड' अशी हाक देत आपलीच वाट पाहात अक्कलकोटी वटवृक्षाखाली स्थिरावला आहे. तेव्हा आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरीत स्वामी चरणी धाव घ्यावी. स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यामुळे आपले सर्व संकटे, समस्या, सर्व अडचणी दूर होतात. एवढेच नाही तर आपल्याला या संसार सागरातून, या भव सागरातून पूर्णपणे तरणोपाय असणारा एकमेद्वितीय हा स्वामी देव आहे, असे आनंदनाथ स्वानुभवातून सांगत आहेत. सर्वंनियन्ता स्वामी देव हा कृपावंत, भक्ताभिमानी आहे. सर्व जगाचे पालकत्व ज्याने स्विकारलेले आहे असा क्षीरसागरात शेषासनावर विश्राम करणारा श्री नारायण जो आहे, तो दूसरा तीसरा कोणीही नसून माझा स्वामी देवच आहे. तो एकच परब्रह्म तत्व असला तरी विविध रुपात, विविध नावाने वावरत असतो. हा त्याचा नित्य खेळ आहे, कारण तो मायाधिपती मुळ पुरुषोत्तम पुरुष आहे. या सृष्टिची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही त्याचीच माया आहे. या कलयुगात अधर्म, अनीती, अनाचार याचा वाढलेला भार नष्ट करण्यासाठी व धर्माची घडी व्यवस्थित  बसविण्यासाठी सर्व देवतांनी मिळून या परब्रह्म तत्वाची प्रार्थना केली. देवतांनी वारंवार केलेल्या विनंतीने हे मुळतत्व जागे होऊन अक्कलकोटी विसावले आहे. याच्या मुळ स्वरूपाची व मुळ सामर्थ्याची ओळख देवतांनाही पूर्णपणे नाही. असे हे अगाध आणि अंनत स्वामी स्वरूप आहे.
        या पूर्ण परब्रह्म तत्वाच्या  प्रभावाखाली हरी, हर, ब्रह्म म्हणजे भगवान विष्णु, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव या प्रमुख देवताही मायेचे खेळणे बनलेल्या आहेत. तेथे ईतर देवतांचा काय पाड ? असा मार्मिक प्रश्न परब्रह्म तत्व सोडून इतरत्र धावणाऱ्या धर्मभोळ्या लोकांना आनंदनाथांनी विचारला आहे. यातून ही जर कोणी सुधारलाच नाही तर त्याला एक शेवटची संधी देऊन आनंदनाथ सांगतात, अरे बाबांनो, हरी, हर, ब्रह्म या प्रमुख देवता, इंद्र, यक्ष, किन्नर, गंधर्व या ईतर देवता, चंद्र, सूर्य इत्यादि ग्रह तारे यापैकी कुणालाही त्याचा अंत लागला नाही. एवढेच नाही तर सर्व ग्रंथ, सर्व शास्त्र आणि चार ही वेद ज्याच्या पुढे मौन धारण करुण उभे आहेत. जेथे वेद ही नेति नेति म्हणून शरणागत होतात, त्याला आपण काय ओळखणार आणि तो आपल्याला काय कळणार ? तेव्हा सरळपणे त्याला शरण जाणे यातच आपले हित आहे. तो परब्रह्म शरणागतवत्सल आहे. तो निश्चित आपल्याला जवळ करेल. आपले सर्वस्वी कल्याण करेल. तेव्हा सर्वांनी त्याच्या पायी लीन व्हावे, असे आनंदनाथ सांगतात.
            अभंगाच्या शेवटी सर्वेश्वर स्वामी महाराजांना आनंदनाथ कळवणून सांगतात, हे दिनानाथ, स्वामी प्रभु आपण तर सर्वश्रेष्ठ आणि ब्रह्माण्डनायक आहात, राजांचे राजे, योग्यांचे योगी आहात. सर्वेश्वर आहात, सर्व शक्तिमान आहात. असे असताना सुद्धा केवळ आणि केवळ आमच्या सारख्या भक्तांसाठी, आमच्या हितासाठीच आपण अक्कलकोटी कासोटी (लंगोटी) धारण करुण राहिलात. हे स्वामीराया ! एवढा ऎश्वर्यसंपन्न असूनही तू केवळ एक लंगोटी धारण करुण आम्हासवे राहतोस, तुला मऊ गादी आणि कठिण दगडी शिळा सारखीच भासते. काट्यांच्या ढिगावर ही तू मखमली गादी असल्या सारखा सहजतेने शांत निद्रा घेतोस. हे तुझे साधेपणच आम्हाला भावते. या साधेपणामुळेच तू आम्हाला परब्रह्म असून ही आमच्या प्रेमळ आजोबा सारखा वाटतो. यापुढे आम्हाला तुझी अशीच संगत लाभू दे, तुझी अशीच कृपादृष्टी आम्हावर सदैव राहू दे, हिच एक अंतरीची मागणी आहे...!
           सज्जनहो, या अभंगातून आपल्याला स्वामींची शक्ति, सामर्थ्य याची जाणीव झाली असेल. या सोबतच एवढे मोठे मुळ परब्रह्म तत्व असूनही स्वामी महाराज हे किती साधेपणाने राहत होते आणि आज त्यांच्याच नावे काहीजण लाखो-करोडो जमा करतात. तेव्हा स्वामी भक्तांनी वेळीच सावध होऊन, यातील सत्यासत्य जाणून घ्यावे. ईतर कोणाच्याही मागे न लागता सरळ स्वामींना शरण जावे. हिच आपुलकीची प्रार्थना आहे.
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥



लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन